कोल्हापूर : नदीकाठासह शेतात विहिरीवरील पाणी उपसा करणाऱ्या महागड्या मोटरची चोरी करणाऱ्या टोळीला करवीर पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. करवीर, पन्हाळ्यासह कळे परिसरातील 7 गुन्ह्यांची चोरट्यांनी कबुली दिली आहे. 21 मोटर्ससह 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सीमाभागातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.
टोळीचा म्होरक्या सुनील सुभाष जाधव (28, रा. वसंत कॉलनी, लिंब आळते, ता. तासगाव, जि. सांगली), सुरज बाळू लोखंडे (26, साठे चौक, रुकडी, ता. हातकणंगले), सुरज संपत गुजले (29), हर्षद विकास पाटोळे (25, दोघे रा. रेणावी, खानापूर जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीतील सराईतांना न्यायालयाने कोठडी सुनावली. संशयितांकडून मोटारही हस्तगत करण्यात आली आहे.टोळीमध्ये आणखी काही साथीदारांचा समावेश असावा, असा संशय आहे. टोळीच्या कारनाम्यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे, असे करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. नदीकाठांसह विहिरीवरील महागड्या मोटर्सच्या चोरींच्या गुन्ह्यात अलीकडे वाढ झाल्याने करवीरचे पोलिस संशयितांच्या मागावर होते. वडणगे-वडणगे फाटा दरम्यान संशयिताच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच मोटारीतील चौघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्यांनी मोटर चोरींची कबुली दिली.