कोल्हापूर : नव्या मोटार वाहन कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलांकडे दुचाकी अथवा चारचाकी वाहन दिल्यास संबंधित पालकांवर थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत तीन वर्षांपर्यंत कारावास आणि 25 हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शहरात कारवाईला वेग आला असून गेल्या आठवडाभरात 36 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल होणार आहे. नव्या कायद्यानुसार वाहन देणाऱ्या पालकांनाच जबाबदार धरले जात असल्याने पालकांत धास्ती निर्माण झाली आहे.
जूनमध्ये कारवाई अधिक तीव
शाळा आणि महाविद्यालये जूनपासून सुरू होणार असल्याने पोलिसांकडून कारवाई अधिक तीव केली जाणार आहे. विशेषतः अकरावी-बारावीतील विद्यार्थी सायकलऐवजी दुचाकींचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक पालकांना नव्या कायद्याची संपूर्ण माहिती नसल्याने गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांची धावपळ सुरू आहे.
18 वर्षांनंतरच लर्निंग लायसन्स
18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लर्निंग लायसन्स मिळत असल्याने अल्पवयीन मुलांना कायदेशीररीत्या वाहन चालविण्याची परवानगी नाही. त्यामुळे अनेक पालक संभमात असून कायद्याची भीतीही वाढली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, 18 वर्षांखालील मुलांकडे कोणत्याही नोंदणीकृत वाहनाची किल्ली देऊ नये. अन्यथा कारवाई अटळ आहे. कमी वेगमर्यादेच्या इलेक्ट्रिक सायकलींचा वापर केला जाऊ शकतो. मात्र नंबर प्लेट आणि नोंदणी असलेली वाहने अल्पवयीन मुलांना देणे टाळावे.