कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नुकताच तिने 12 वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद परिवारासोबत साजरा केला. उन्हाळी सुट्टीत ती सहकुटुंब उत्तर भारत दर्शनासाठी गेली होती; मात्र तेथे आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा 50 पार गेला होता. त्याचा जबर तडाखा तिला बसला आणि तिची प्राणज्योत मालवली. जान्हवी प्रकाश चव्हाण (वय 19, रा. फुलेवाडी, दुसरा स्टॉप) असे या युवतीचे नाव आहे.
काशी, मथुरा, अयोध्या, उज्जैन देवदर्शनासाठी घरच्यांनी प्लॅनिंग केले होते. यात 12 वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा एक वेगळाच आनंद होता. या आनंदात जान्हवी ट्रीपला रवाना झाली; मात्र उत्तर भारतात वाढलेल्या तापमानामुळे तिला उज्जैनमध्ये उष्माघाताचा त्रास सुरू झाला. अशक्तपणा, उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसू लागली. उज्जैनवरून परताना शिर्डी येथे तिला उष्माघाताचा तीव्र त्रास सुरू झाला. यानंतर तिला शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तिला हीट स्ट्रोक झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितल्याचे परिवारातील लोकांनी सांगितले.
वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी रुग्णालयात दाखल
जान्हवी नुकतीच 12 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. दि. 29 रोजी तिचा 18 वा वाढदिवस होता. 30 मे रोजी तिला रुग्णालयात दाखल केले. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणून जल्लोष करत हसत खेळत परिवारासोबत ट्रीपला गेलेली एकुलती मुलगी आता आपल्यात नाही हा धक्का तिच्या आई-वडिलांसाठी सहन करण्यापलीकडे आहे.