प्रवीण मस्के
कोल्हापूर : फार्मसी प्रवेश प्रक्रियेत यंदा पुन्हा गोंधळ उडाला असून, विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून (झउख) अद्याप प्रवेश धोरण निश्चित न झाल्याने ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच सत्रात वर्षभराचा अभ्यास पूर्ण करून परीक्षेला बसावे लागण्याची वेळ येऊ शकते. यामुळे फार्मसी प्रवेशाचे गणित बिघडले असून, विद्यार्थ्यांचे करिअर गोंधळात अडकले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बी.फार्मसीची 38 महाविद्यालये असून, त्यांची प्रवेश क्षमता 2400 आहे. तसेच, एम.फार्मसीच्या 23 महाविद्यालयांमध्ये 1,310 प्रवेश जागा आहेत. बारावीचा निकाल मे महिन्यात लागला; पण तीन महिन्यांनंतरही प्रवेश प्रक्रियेला वेग आलेला नाही. सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रियेला वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. अद्याप प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयांना मान्यता विलंबाने मिळत असल्याने प्रवेश प्रक्रिया रखडत आहे. प्रवेशाला दिवाळीनंतरच सुरुवात होण्याची शक्यता असून, डिसेंबरपर्यंत प्रक्रिया सुरू राहील. परिणामी, पहिल्या सत्रात परीक्षा होणे शक्य नाही. विद्यार्थ्यांना दुसर्या सत्रात वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
मागील वर्षीही अशाच प्रकारचा गोंधळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले होते. त्यामुळे फार्मसीच्या तब्बल 58 टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदाही तीच परिस्थिती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सततच्या विलंबामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून, विद्यार्थ्यांचे निम्मे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. असाच विलंब सुरू राहिला, तर फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेवरील विश्वासच डळमळीत होईल. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
गेली तीन-चार वर्षे फार्मसी कौन्सिलकडून वेळेत महाविद्यालयांना मान्यता दिली जात नाही. त्यामुळे दरवर्षी प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुरू राहते. फार्मसी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी दुसर्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. परिणामी, फार्मसी महाविद्यालयांमध्ये प्रवेश न झाल्याने रिक्त जागा वाढत आहेत. आगामी काळात फार्मसीची बहुतांश महाविद्यालये बंद पडतील.डॉ. एच. एन. मोरे, प्राचार्य, भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज, कोल्हापूर