तानाजी खोत
कोल्हापूर : मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून याचा थेट फटका कोल्हापूरकरांना बसला आहे. इराणने आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे दुबई आणि अबुधाबी विमानतळावर कोल्हापुरातील 100 हून अधिक नागरिक सध्या अडकून पडले आहेत. यामध्ये उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि पर्यटकांचा समावेश आहे.
विश्व एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून जॉर्जिया येथील विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले सहा विद्यार्थी केअरटेकरसह दुबईत अडकले आहेत. दुबईतून कनेक्टेड विमानाने ते जॉर्जियाला जाणार होते. मात्र इराणची हवाई हद्द बंद झाल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही. विश्व एज्युकेशनचे ज्ञानेश्वर भस्मे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांना आता पर्यायी मार्ग म्हणून पाकिस्तानमार्गे जॉर्जियाला घेऊन जाण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापुरातील अ हेवन हॉलिडेज या ट्रॅव्हल एजन्सीचा 44 लोकांचा ग्रुप दुबई-अबुधाबी सहल संपवून 2 मार्च रोजी परतणार आहे. मात्र, विमानसेवा ठप्प झाल्याने या पर्यटकांना दुबईतच थांबावे लागण्याची शक्यता आहे. अ हेवनचे टूर मॅनेजर प्रणव कदम यांनी दुबईतून सांगितले की, 1 मार्चची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. 2 मार्चच्या विमानांबद्दल काही सांगण्यात आलेले नाही. दुबईत सध्या परिस्थिती सामान्य असून पर्यटकांमध्ये कोणताही तणाव नाही. आमची सहल नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सुरू आहे. याशिवाय पुण्याच्या ‘गिरीकंद हॉलिडेज’चे 40 पर्यटकही सध्या दुबईत अडकले असून त्यामध्ये काही कोल्हापूरच्या प्रवाशांचा समावेश आहे.