Delhi airport flight delays | दिल्ली विमानतळावर अडकले कोल्हापूरचे प्रवासी Pudhari
कोल्हापूर

Delhi airport flight delays | दिल्ली विमानतळावर अडकले कोल्हापूरचे प्रवासी

कोल्हापुरातील इंडिगोची विमानसेवाही उशिराने

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दिल्ली विमानतळावर गुरुवारी कोल्हापूरचे 35 प्रवासी आठ तासांहून अधिक काळ अडकले. इंडिगोची कोल्हापुरातील विमानसेवाही काहींशी उशिराने सुरू होती. कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांची काळजी घेण्यात आली. दिल्ली विमानतळावर मात्र कोणतीच माहिती वेळेत मिळत नसल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण होते.

इंडिगोच्या विमानसेवा आजही अनेक ठिकाणी विस्कळीत झाल्या. दिल्ली-पुणे या फ्लाईटमधील प्रवाशांनाही त्याचा फटका बसला. सकाळी दहा वाजता टेक ऑफ होणार्‍या फ्लाईटमधील अडीचशेहून अधिक प्रवाशांना दुपारपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये कोल्हापूरच्या 35 प्रवाशांचाही समावेश होता.

कोल्हापूरमधील 35 जणांचा एक गट दिल्लीहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी आठ वाजता विमानतळावर पोहोचला होता. सकाळी 10 वाजता उड्डाणाची वेळ दिली होती. त्यानंतर ती साडेदहा वाजता करण्यात आली. अनेक वेळा गेट नंबर बदलले. अखेर दुपारी 12 वाजता प्रवासी विमानात बसले. मात्र, त्यानंतरही सुमारे चार तास विमानाचे उड्डाण झाले नाही. उड्डाण का होत नाही, हे सांगितले जात नव्हते, त्यातच कोणालाही विमानातून उतरूही दिले जात नव्हते.

कोल्हापुरातील विमानसेवेवरही परिणाम

कोल्हापूर विमानतळावरील इंडिगोच्या विमानसेवेवरही परिणाम झाला. हैदराबाद व बंगळूर दरम्यानच्या विमानसेवेला अनुक्रमे 45 व 20 मिनिटे उशीर झाला. या सर्व प्रवाशांना विमानतळावर अल्पोपहार देण्यात आला. असाच प्रकार आणखी काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी एअरलाईन्स बरोबर संपर्क साधून आपल्या आवश्यकतेनुसार हवा तो बदल करून घ्या अथवा तिकीट रद्द करून घ्यावे, असे आवाहन स्थानिक इंडिगो व्यवस्थापनाने केले आहे.

  • विमानात लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्ती होत्या.

  • प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. एका मधुमेहाच्या रुग्णाचे इन्सुलिन विमानाच्या लगेजमध्ये अडकले.

  • लहान मुलांसह अनेकांचे जेवणाचेही हाल झाले. विमानात या कालावधीत कोणतेही अन्नपदार्थ पुरवले नाहीत, असेही एका प्रवाशाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT