कोल्हापूर : कोल्हापूर शहरात महापालिका इमारतीजवळ असलेल्या बाजार गेट आणि पानलाईन परिसरातील हातगाड्या काढताना फेरीवाले आणि मनपा अधिकारी यांच्यात शुक्रवारी (दि. ४) वादावादी झाली. फेरीवाल्यांनी एकत्रित येऊन कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई करत तब्बल ८५ हातगाड्यांची तपासणी करून अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २, छत्रपती शिवाजी मार्केट, इस्टेट व अतिक्रमण निर्मूलन पथका मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्यांवर ही कारवाई केली. कारवाईत ९ लोखंडी खाट, १६ बुट्या, ५ टेबल, १६ पार्किंग जाळ्या, १ टेंट, ८ लोखंडी पाईप, १२ खुर्च्या, २३ प्लास्टिक साहित्य तसेच संपूर्ण मांडव जप्त करण्यात आला. २५ हातगाड्या संबंधित मालकांनी स्वतःहून हटविल्या. उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे व सजन नागलोत यांनी कारवाई केली.
१०० मीटर परिसरातील अतिक्रमणे हटवा...
कोल्हापुरातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था तसेच हॉस्पिटल परिसरात १०० मीटरपर्यंत हॉकिंग अथवा फेरीवाला व्यवसायास परवानगी देणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाले व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण तसेच व्यवसायाचे साहित्य तत्काळ स्वतःहून हटवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.