महाडीकवाडी (ता. पन्हाळा) येथील ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पन्हाळा पोलिसांनी २४ तासांत अटक केली. Pudhari Photo
कोल्हापूर

Panhala Theft Case : फोन पे व्यवहार अन् कापडाच्या तुकड्यामुळे लागला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!

महाडीकवाडीतील जबरी चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा; दोघांना अटक, पाच तोळे सोन्याचा ऐवज जप्त

पुढारी वृत्तसेवा

इंद्रजित शिंदे

Panhala Theft Case

पन्हाळा : चोरीच्या ठिकाणी वृद्धेला बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कापड आणि संशयिताने डिजिटल पेमेंटद्वारे कापड दुकानातून खरेदी केलेले कापड हुबेहूब जुळल्याने पन्हाळा पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण धागा मिळाला. मोबाईलमधील ‘फोन पे’ व्यवहार आणि कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पन्हाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पाच लाख रुपयांच्या जबरी चोरीचा छडा लावला. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला पाच तोळे सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नंदकिशोर सदानंद महाडीक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडीक (वय २८, दोघेही रा. महाडीकवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास महाडीकवाडी येथील बापू महाडीक यांच्या घरात दोन अज्ञातांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या आईचे तोंड व हात पांढऱ्या कापडी पट्ट्यांनी बांधून दुखापत केली. त्यानंतर पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या आणि बुगडी असा पाच तोळे वजनाचा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला. याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा आणि पोलिस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. मात्र, कोणतीही संशयित गाडी किंवा बाहेरील व्यक्ती आढळून न आल्याने पोलिसांचा संशय स्थानिक व्यक्तींकडे वळला.

दरम्यान, बातमीदारामार्फत नंदकिशोर महाडीक हा कर्जबाजारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईलची बारकाईने तपासणी केली असता ७ सप्टेंबर रोजी एका कापड दुकानात ‘फोन पे’द्वारे केलेला व्यवहार आढळून आला.

पोलिसांनी तत्काळ संबंधित कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात नंदकिशोरने खरेदी केलेले कापड आणि चोरीच्या ठिकाणी वृद्धेला बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कापड यांच्यात हुबेहूब साम्य आढळले. हा महत्त्वाचा पुरावा पोलिसांनी त्याच्यासमोर ठेवताच नंदकिशोरने मित्र रमेश महाडीक याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रमेश महाडीक यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीस गेलेले पाच तोळे सोन्याचे दागिने, सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज, हस्तगत करण्यात आला.

गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश खोत करीत आहेत. पोलिस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले आणि अमर चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT