Woman Sharp Weapon Attack in Kololi Panhala
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छबुताई सर्जेराव पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी (दि.२५) सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.
आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. या घटनेमुळे कोलोली परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.