पन्हाळा : कासारी नदीवरील बोरगाव-पोहाळे धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या कसबा बोरगाव (ता. पन्हाळा) येथील विकास विठ्ठल चौगुले (वय ३२) या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तब्बल दहा तास शोधमोहीम राबवूनही विकास यांचा मृतदेह हाती लागला नाही. सायंकाळी अंधार पडल्याने शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास चौगुले हे रविवारी सकाळी आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे कासारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक दम लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या घोटवडे येथील दोन तरुणांनी तत्काळ त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.
दोन्ही तरुणांनी विकास यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ओढून आणत असताना दोघेही पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. सुदैवाने त्यांनी कसाबसा किनारा गाठत आपला जीव वाचवला. मात्र, विकास हे त्यांच्या डोळ्यांदेखत खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात बोट आणि गळाच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. तब्बल दहा तास नदीपात्राचा परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि सायंकाळनंतर वाढलेला अंधार यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. अखेर सुरक्षिततेच्या दृष्टीने सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली.
विकास चौगुले यांच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेने चौगुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच बोरगावसह परिसरातील ग्रामस्थांनी नदीघाटावर मोठी गर्दी केली होती. मृतदेह अद्याप हाती न लागल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे कसबा बोरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
मृत विकास चौगुले हे कुटुंबातील एकुलते एक होते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. नवविवाहानंतर काही दिवसांतच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. विकास यांच्या मृत्यूच्या वृत्ताने नवविवाहित पत्नीवरही दुःखाचा डोंगर कोसळला असून, चौगुले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.