सुरेश दाभाडे, पूजा दाभाडे Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Crime | काखे येथे अनैतिक संबंधातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून

घरासमोर अंगणातच चाकूने केले सपासप वार : फरार संशयित आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

Panhala Married Woman Killed

वारणानगर : काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून विवाहित महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केला. ही थरारक घटना बुधवारी (दि.२) भरदिवसा दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५, रा. काखे) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना संशयित आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले, तो पर्यंत पूजा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. त्यानंतर सुरेश घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांना स्थानिकांनी तातडीने कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मृत पूजा काही महिने आरोपी सुरेश सोबत बाहेरगावी राहिली होती. सध्या ती सासरी काखे येथे राहत होती. आरोपी सुरेश हा सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून वारणानगर कामगार कॉलनीतील १८ जुलै रोजी २ तोळे सोने व ४० हजाराची रोकड चोरीस गेली होती. त्यातील आरोपी हे त्याचे नातेवाईकच असल्याने सुरेशवर संशय होता. मात्र, पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले होते.

त्यावेळी पोलिसांनी ठोस पुरावे नसल्याचे सांगून त्याच्यावर कारवाई केली नव्हती. पोलिसांनी आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर आज हा अनर्थ घडला नसता, असा थेट आरोप नातेवाइकांनी रुग्णालयात केला . "जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत. कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसूटगे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT