किल्ले पन्हाळा 
कोल्हापूर

कोल्हापूर : किल्ले पन्हाळा पर्यटन महोत्सव आजपासून

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘13 डी थिएटर’चे गुरुवारी लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : किल्ले पन्हाळगडाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 7 मार्चदरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन, लघुपट अनावरण, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी (दि. 6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘13 डी थिएटर’चे लोकार्पण आणि ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’ या लघुपटाचे अनावरण करण्यात येणार आहे.

पर्यटन महोत्सवाची सुरुवात मंगळवारी (दि. 4) संध्याकाळी 5 वाजता पन्हाळा येथील इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये उद्घाटन सोहळा आणि ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाने होणार आहे. बुधवारी (दि. 5) दुपारी 4 वाजता शिवतीर्थ उद्यानासमोर विद्यार्थी कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य-नाट्य सादर करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता संगीत क्षेत्रातील ‘झी सारेगम’ विजेता प्रसेनजित कोसंबी आणि स्वरदा गोडबोले यांचा चित्रपट गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पन्हाळगडावरील ‘13 डी थिएटर’चे लोकार्पण होणार असून, यावेळी ‘पन्हाळगडाचा रणसंग्र्राम’ या ऐतिहासिक लघुपटाचे अनावरण आणि जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 7) पन्हाळा येथील अंबरखाना परिसरात चित्रकार व शिल्पकार आपली प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता ‘कोल्हापूर जिल्ह्यातील गड-किल्ले’ या विषयावर रील्स, यूट्यूब व्हिडीओ आणि फोटोग्राफी स्पर्धांचे पारितोषिक वितरण होणार आहे.

पन्हाळगडाच्या पर्यटन विकासासाठी येथे उभारण्यात आलेल्या ‘13 डी थिएटर’मधून ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या गडावरील पर्यटन वाढवण्यासाठी लाईट शो, साऊंड शो, लेसर शो, तसेच इंटरप्रिटेशन सेंटर आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे 20 ते 25 लाख पर्यटक भेट देणार्‍या पन्हाळगडावर आयोजित हा महोत्सव ऐतिहासिक वारशाला उजाळा देण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पर्यटक आणि नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT