कुरुंदवाड : पंचगंगा नदीत रासायनिक पाणी मिसळल्याने शिरोळ-तेरवाड बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचे ढीग साचले असून पाण्याला तीव्र दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सांगितले की, सकाळी नदीकाठी गेल्यानंतर पाण्याचा रंग बदललेला दिसला व उग्र वास जाणवत होता. काही अंतरावर पुढे गेल्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना आढळले. विशेष म्हणजे लहान नव्हे तर मोठ्या आकाराचे मासेही मृत अवस्थेत दिसून आल्याने प्रदूषणाची तीव्रता गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच एक मासेमारी या ठिकाणी आपले जाळे टाकून मासे पकडत असताना ग्रामस्थांनी त्याला अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना यातील मासे कशासाठी पकडत आहात असा संतप्त सवाल करत त्याला धारेवर धरले आणि मासे पकडण्यास त्याला मज्जाव केला.
पंचगंगा नदीवरील पाणीपुरवठा योजनांवर अनेक गावांचे पिण्याचे पाणी अवलंबून आहे. अशा परिस्थितीत नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र पाहून ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे. “हेच पाणी आम्ही पितो, मग आमच्या आरोग्याचे काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. औद्योगिक किंवा रासायनिक सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यात मंडळ पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी त्वरित पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा संघटक वैभव उगळे यांनी प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. “पाणी प्रदूषित करणाऱ्या संबंधित उद्योगांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा मृत माशांचा हार घालून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.