Kolhapur panchganga pollution 
कोल्हापूर

पंचगंगेचे पुन्हा प्रदूषण; काळे-फेसाळ पाणी, दुर्गंधीने शेतकरी संतप्त

Kolhapur panchganga pollution | पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पंचगंगा नदीमध्ये पुन्हा एकदा रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्याची भीषण अवस्था झाली आहे. काळपट, फेसाळलेले आणि तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे चित्र आज सकाळपासून दिसून आले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून शेतीसाठी हे पाणी वापरणे धोकादायक ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बंधाऱ्याच्या एका बाजूला जलपर्णीने संपूर्ण नदीपात्र व्यापलेले असताना दुसऱ्या बाजूला रासायनिक पाण्यामुळे काळसर, फेसाळलेले पाणी वाहताना दिसत आहे. या दुहेरी संकटामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप पूर्णपणे बिघडले असून दुर्गंधीमुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

महावीर कोप्पे म्हणाले, या प्रदूषित पाण्यामुळे पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शेतीला हे पाणी पाजल्यास जमिनीची सुपीकता कमी होण्याची शक्यता असून उत्पादनावरही विपरीत परिणाम होणार आहे. हे शेतीला पाणी पाजत असताना आमच्या हातावर इन्फेक्शन होऊन खाज सुटली आहे व हाताला खरूज निर्माण झाल्यासारखी स्थिती झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, सकाळपासून नदीतील ही परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी नेते शाबुगोंडा पाटील यांनी केला आहे. “वारंवार होणाऱ्या प्रदूषणामुळे शेती धोक्यात आली आहे. संबंधित उद्योगांवर कठोर कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचे आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. पंचगंगेतील वाढते प्रदूषण हा गंभीर प्रश्न बनत चालला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT