कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर मंगळवारी पुन्हा वाढला. पहाटे ४ वाजता पंचगंगा नदीची पातळी २८ फूट १० इंचांवर पोहोचली. पंचगंगा घाटावरील मारुतीच्या पायाला पाणी लागले होते. यानंतर पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली असून रात्री ९ वाजता पातळी २७ फूट ६ इंचांवर होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत राधानगरीसह पाच धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला बुधवारी (दि. २२) पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
शहरात मंगळवारी पावसाचा जोर वाढला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.५ मि.मी. पाऊस झाला. यात सर्वाधिक २६.५ मि.मी. पाऊस राधानगरी तालुक्यात झाला. पावसामुळे ५ घरांची अंशतः पडझड झाली. जिल्ह्यातील एकूण ६ खासगी मालमत्तांचे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. रात्री ९ वाजता पातळी २७ फूट ६ इंचांवर स्थिरावली होती. जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.