कोल्हापूर : शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेने शुक्रवारी पंचगंगा घाटाभोवतीचा परिसर बॅरिकेडिंग करून अडविला आहे. त्याबरोबरच येथे पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनी गणेशमूर्ती दान करून नदीचे प्रदूषण टाळावे, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.
इराणी खण येथे करण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेची महापौर निकम व आयुक्त भारूड यांनी शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला. येथे बसविलेल्या स्वयंचलित यंत्राची चाचणी महापौरांच्या हस्ते गणपतीची मूर्ती ठेवून घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्यासह इतर उपस्थित होते. शहरातील चारही विभागीय कार्यालयांतर्गत विसर्जन कुंडांमधून संकलित केलेल्या गणेशमूर्ती या यंत्रणेद्वारे इराणी खण येथे विसर्जित करण्यात येणार आहेत.