एकुलत्या मुलाच्या डेंग्यूसारख्या आजाराने मृत्यू 
कोल्हापूर

Kolhapur : उपचारासाठी मोटारसायकलवरून गेला... दुसर्‍या दिवशी शववाहिकेतून मृतदेहच आला

एकुलत्या मुलाच्या डेंग्यूसारख्या आजाराने मृत्यू; जिवबा नाना पार्कमधील कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘ताप कमी होत नाहीये, अशक्तपणा वाढतोय... थोडं डॉक्टरांकडे जाऊन येतो’ असं सांगत जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील प्रथमेश घाटगे (वय 22) हा तरुण सोमवारी सायंकाळी घरच्यांच्या डोळ्यासमोर मोटारसायकलवरून उपचारासाठी घरातून निघाला; पण दुसर्‍या दिवशी सकाळी थेट त्याचा मृतदेहच शववाहिकेतून आणण्याची वेळ त्यांच्या परिवारावर आली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, एका एकुलत्या तरुण मुलाच्या मृत्यूने घाटगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डेंग्यू सद़ृश आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

प्रथमेशला 7 जून रोजी ताप आला होता. प्राथमिक तपासणीसाठी तो डॉ. विजय कुलकर्णी यांच्याकडे गेला. त्यांच्या सल्ल्यानुसार आयजीएम आणि आयजीजी या डेंग्यूच्या चाचण्या करण्यात आल्या. दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले म्हणून ओपीडीवर औषधोपचार सुरू ठेवण्यात आले; मात्र 9 जून रोजी त्याची तब्येत पुन्हा खालावली. सलाईन लावण्यासाठी तो पुन्हा डॉक्टरांकडे गेला असतात्याची प्रकृती गंभीर झाली. तत्काळ त्याला डॉ. सागर पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच 10 जूनच्या पहाटे दोनच्या सुमारास त्याचे निधन झाले. मंगळवारी सकाळी जेव्हा शववाहिकेतून त्याचा मृतदेह घरी आणला गेला, तेव्हा कुटंबीयांसह संपूर्ण परिसर शोकमग्न झाला.

आई, वडिलांसह नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडल्याने सार्‍या परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांतच अश्रू आले.प्रथमेशच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ तो राहत असलेल्या परिसरातील 100 घरांमध्ये सर्वेक्षण हाती घेतले. त्यात 312 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 जणांना ताप आल्याचे आढळून आले.

पावसाळ्यात पाण्याची डबकी तयार होणार नाहीत, यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. ताप आल्यास त्वरित डॉक्टर किंवा महापालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. दिरंगाई धोकादायक ठरू शकते.
डॉ. प्रकाश पावरा, आरोग्याधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT