Kolhapur boundary extension | 79 वर्षांनंतर कोल्हापूर हद्दवाढीच्या उंबरठ्यावर! Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur boundary extension | 79 वर्षांनंतर कोल्हापूर हद्दवाढीच्या उंबरठ्यावर!

आठ गावांचा समावेश सुचवत शासनाकडून प्रक्रिया गतिमान; विकासाचे नवे पर्व सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या अनेक दशकांपासून सतत चर्चेत असतानाही आजवर केवळ चर्चा आणि प्रस्तावापुरता मर्यादित राहिला; मात्र मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आठ गावांच्या समावेशासह नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्याने हद्दवाढीच्या प्रक्रियेला बळ मिळाले असून ती आता द़ृष्टिक्षेपात आली आहे.

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अनेकदा चर्चेत येतो आणि त्यानंतर तो हवेतच विरून जातो. आजवर असाच काहीसा अनुभव आला आहे. कोल्हापूरच्या मागून पुणे, सोलापूर, सांगली शहरांची अनेकदा हद्दवाढ झाली; पण हद्दवाढीअभावी कोल्हापूरचा विकास नेहमी खुंटतच राहिला. 1871 ते 1946 या दरम्यानच्या काळात शहराच्या हद्दीत काहीशी वाढ झाल्याचे पुरावे आहेत; परंतु त्यानंतर मात्र एक इंचही हद्दवाढ झाली नाही. 15 डिसेंबर 1972 रोजी कोल्हापूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले; पण नगरपालिकेऐवजी महापालिका असा फलक लागला इतकाच काहीसा फरक पडला. एका इंचानेही हद्दवाढ न होता महापालिकेत रूपांतर होणारी कोल्हापूर ही एकमेव नगरपालिका होती. या घटनेलासुद्धा आता 54 वर्षे झाली आहेत.

कोल्हापूर महापालिकेने अनेकदा हद्दवाढीचे प्रस्ताव राज्यशासनाल पाठविले; परंतु त्याला नेहमी केराचीच टोपली दाखविण्यात आली. 24 जुलै 1972 रोजी 42 गावांचा समावेश असलेला प्रस्ताव शासनकडे पाठविला. त्यानंतर 2009, मार्च 2010 पासून अकरावेळा प्रस्ताव पाठविण्यात आला. हद्दवाढ होणारा शासनआदेश तयार आहे, असे वातावरण 2016 मध्ये झाले असताना ऐनवेळी 30 ऑगस्ट 2016 मध्ये कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 7 जानेवारीला पुन्हा हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर दोन औद्योगिक वसाहतींसह 20 गावांचा समावेश करण्यात आला होता; पण आता पुन्हा राज्यशासनाने आठ गावांचा समावेश करण्याची सूचना केली आहे.

79 वर्षांची प्रतीक्षा, 54 वर्षे स्थैर्य; आता नव्या पर्वाची सुरुवात

कोल्हापूर महापालिका स्थापन झाली 15 नोव्हेंबर 1972 रोजी. त्याआधी ही नगरपालिका होती; मात्र रूपांतरानंतरही हद्दवाढ झाली नाही, ही दुर्मीळ बाब ठरली. 1871 ते 1946 या कालावधीनंतर एक इंचही हद्दवाढ न झाल्याने कोल्हापूरचा विकास खुंटला, अशीच शहरवासीयांची भावना आहे. पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सांगलीसारख्या शहरांनी हद्दवाढ करत वेग घेतला; पण कोल्हापूर मात्र मागे राहिले. आहे तेवढ्याच हद्दीत गुदमरत राहिले. 79 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता कोल्हापूरची हद्दवाढ द़ृष्टिक्षेपात आली आहे. हद्दवाढ झाल्यास शहराच्या विकासाचे नवे पर्व सुुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT