दर्शन वडेर
नृसिंहवाडी : भारतीय प्राचीन वैद्यकशास्त्राचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून देशभरात पाच नवीन आयुर्वेद गुरुकुलम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध दत्तक्षेत्र नृसिंहवाडीची निवड करण्यात आली आहे. गुरुकुल व संस्कृत परंपरेला केंद्रस्थानी ठेवून निवासी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.
या गुरुकुल शिक्षणपद्धतीत केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. संस्कृत भाषेतील मूळ आयुर्वेद ग्रंथांचे सखोल अध्ययन, चरकसंहिता व सुश्रुतसंहितेतील सिद्धांतांचा प्रत्यक्ष वापर, औषधी वनस्पतींची ओळख तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहून औषधनिर्मितीचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. संस्कृत भाषेतील आयुर्वेदाच्या एकात्मिक उपचारपद्धतीला जागतिक मान्यता मिळवून देणे, हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. यासाठी दहावीनंतर नीट (प्री-आयुर्वेद) परीक्षा घेतली जाणार असून, सुरुवातीला दोन वर्षांचा पूर्व-आयुर्वेद अभ्यासक्रम व त्यानंतर साडेपाच वर्षांचा बीएएमएस अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. या शिक्षणसंस्था केंद्रीय संस्कृत विद्यापीठाशी संलग्न राहतील. विशेष म्हणजे पूर्व अध्यापनात संस्कृत विषय असणार आहे.
पाच कोटी लोकसंख्येमागे एक अशा प्रमाणात आयुर्वेद गुरुकुलांची स्थापना केली जाणार आहे. महाराष्ट्रात नृसिंहवाडी येथील चिमासाहेब जगदाळे फाऊंडेशनमध्ये हे गुरुकुलम सुरू होणार आहे. यासोबतच उत्तराखंड, आसाम, कर्नाटक व उत्तर प्रदेश येथेही २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून गुरुकुलम कार्यान्वित होतील.
विद्यार्थ्यांना जागतिक संधी
सध्या जगभरात होलिस्टिक हीलिंग व वेलनेस टुरिझमचे आकर्षण वेगाने वाढत आहे. पाश्चिमात्य देशांमध्येही आयुर्वेदाची मागणी वाढत आहे. आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांचे सखोल ज्ञान असल्यामुळे हे गुरुकुल विद्यार्थी केवळ डॉक्टर म्हणून नव्हे, तर परदेशी विद्यापीठांमध्ये आयुर्वेद संशोधक व आंतरराष्ट्रीय योग व आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून काम करू शकतील. आयुर्वेद शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक संधी खुणावत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आयुर्वेद गुरुकुलम शिक्षणपद्धती नव्याने विकसित केली आहे. आयुर्वेद व प्राचीन भाषेचा या निर्णयाने अतूट सन्मान होणार आहे. याद्वारे आयुर्वेदाच्या अभ्यासाला नवी ओळख मिळणार असून, दहावीनंतरच विद्यार्थ्यांना डॉक्टर बनता येईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा उपक्रम निश्चित यशस्वी होईल.- डॉ. श्रीनिवास वरखेडी, कुलगुरू, केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली