Nrusinghawadi Datta Mandir 24 hours open
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात भक्तीमय वातावरणात संततधार अनुष्ठानास प्रारंभ झाला. वाढत्या उन्हाचा दाह श्रींच्या चरणपादुकांना होऊ नये आणि विश्वावरील अरिष्टे दूर होऊन सुख-शांती लाभावी, या हेतूने प्रतिवर्षाप्रमाणे अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिर दर्शनासाठी दिवस रात्र खुले असणार आहे.
पहाटे श्रींच्या पादुकांची षोडशोपचार पूजा करण्यात आली. नारायणस्वामी मठातून श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर श्रींच्या पादुकांवर कृष्णा नदीच्या अखंड अभिषेकास प्रारंभ झाला. यावेळी ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषाने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
सायंकाळी आरती व प्रार्थना झाल्यावर शंखतीर्थ हा विशेष विधी संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांवर श्रींच्या चरणतीर्थाचा वर्षाव करण्यात आला. यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री श्रींच्या पादुकांवर महापूजा होऊन पालखी सोहळा पार पडला. पुढील सात दिवस उत्सव होणार असून ३१ मार्च रोजी सांगता होणार आहे.