Kolhapur Voter List | ‘कोल्हापूर उत्तर’ सर्वाधिक ८० हजार ५२१, ‘शाहूवाडी’त सर्वात कमी २८,२५८ नावे रद्द 
कोल्हापूर

Kolhapur Voter List | ‘कोल्हापूर उत्तर’ सर्वाधिक ८० हजार ५२१, ‘शाहूवाडी’त सर्वात कमी २८,२५८ नावे रद्द

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘कोल्‍हापूर दक्षिण’मधून ६७,९२३ नावे वगळली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मतदार याद्यांच्‍या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार पडताळणीनंतर सोमवारी (दि. ३१) जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. या प्रारूप मतदार यादीतून सर्वाधिक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ८० हजार ५२१ तर सर्वात कमी शाहूवाडी मतदारसंघातून २८ हजार २५८ नावे रद्द करण्यात आली आहेत. यासह मॅपिंग न झालेल्या १ लाख १५ हजार ९४६ तर विसंगती आढळून आलेल्या १ लाख १७ हजार ४४६ अशा एकूण २ लाख ३३ हजार ३९२ मतदारांच्या सुनावण्या घेतल्या जाणार आहेत. या सुनावणीत दाखल केलेल्या पुराव्यांनंतरच त्यांचे नाव अंतिम मतदार यादीत राहणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत दि. ३० जून ते दि. १७ ऑगस्ट या कालावधीत एसआयआर प्रक्रियेंतर्गत ३३ लाख ५५ हजार २४४ इतक्या मतदारांची पडताळणी झाली. ३ हजार ४५० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदारांना गणना अर्जांचे वाटप केले. नंतर हे अर्ज भरून घेण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. ३१) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार मतदार यादीतील मयत, दुबार, अनुपस्थित, कायमचे स्थलांतरित आणि इतर अशा पाच वर्गवारीतील एकूण ४ लाख ४९ हजार २१३ मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्ह्याची एकूण २९ लाख ६ हजार ३१ मतदारांची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

‘कोल्‍हापूर उत्तर’मधून सर्वाधिक २६.३७ टक्के, सर्वात कमी ‘शाहूवाडी’तून ९.१७ टक्के नावे रद्द

जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर या पूर्ण शहरी असलेल्या मतदारसंघातून सर्वाधिक ८० हजार ५२१ मतदारांची नावे रद्द झाली आहेत. हे प्रमाण या मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी तब्बल २६.३७ टक्के इतके आहे. सर्वात कमी शाहूवाडी मतदारसंघातून २८ हजार २५८ मतदारांची नावे रद्द झाली आहेत. हे प्रमाण या मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी ९.१७ टक्के इतके आहे.

२ लाख ३३ हजार ३९२ मतदारांच्या सुनावण्या होणार

जिल्ह्यातील मतदार यादीत १ लाख १७ हजार ४४६ मतदारांत विसंगती आढळून आली आहे. तर, १ लाख १५ हजार ९४६ मतदार अनमॅपिंगच्या यादीत आहेत. या सर्वांना नोटीस बजावून त्यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत संबंधित मतदारांना त्याबाबतचे योग्य ते पुरावे सादर करावे लागतील. त्यानंतरच त्यांचे नाव मतदार यादीत राहणार आहे.

सुनावणीसाठी ११३ अधिकाऱ्यांची नियुक्ती

या सुनावणीसाठी दहा मतदारसंघांत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसह एकूण ११३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दि. १ सप्टेंबर ते दि. २९ ऑक्टोबर या कालावधीत संबंधितांना नोटीस देण्यात येतील. यानंतर त्यांची संबंधित मतदारसंघात निश्चित केलेल्या ठिकाणी सुनावणी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT