कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला जाणार हे स्पष्ट आहे Pudhari File Photo
कोल्हापूर

महाविकास आघाडीअंतर्गत काँग्रेसला ‘कोल्हापूर उत्तर’

पुढारी वृत्तसेवा
सतीश सरीकर

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने राजकीय पक्षांतही चुरस निर्माण झाली आहे. एकेक विधानसभा मतदारसंघासाठी चढाओढ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांतील फुटीमुळे प्रत्येक मतदारसंघातील गणिते पूर्णतः बदलली आहेत. इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र, महाविकास आघाडींतर्गत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला स्वीकारला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 150 जागांचे वाटप निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला जाणार हे स्पष्ट आहे.

कोल्हापूर महापालिकेवर 2010 सालापासून काँग्रेसची सत्ता असली तरी विधानसभेला मात्र कोल्हापूरकरांचा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. कोल्हापूर शहरवासीयांची महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळी भूमिका असते. सद्य:स्थितीत मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसच्या आ. जयश्री जाधव करत आहेत. आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून लढण्यासाठी जोरदार तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडी अतंर्गत हा मतदारसंघ काँग्रेसला गेला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, परंतु राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला बहाल करण्यात आला. त्यावेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याची कमिटमेंट राज्य पातळीवरील नेत्यांत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुकांनी कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा यासाठी ‘मातोश्री’वर मनधरणी करत असल्याचे सांगण्यात येते.

शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरीची शक्यता

शिवसेना ठाकरे गटातून अनेकजण कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. गेले काही महिने त्यांनी निवडणुकीची तयारीही केली आहे, परंतु विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला जाणार हे स्पष्ट आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुकांनाही त्याची कुणकुण लागली आहे. परिणामी काही इच्छुकांनी आता मनसे, वंचित आघाडीसह इतर पक्षातून चाचपणी सुरू केली आहे. परिणामी शिवसेना ठाकरे गटातून कोल्हापूर उत्तरमध्ये बंडखोरीची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

आ. जाधव, सतेज पाटील की सरप्राईज उमेदवार?

सद्य:स्थितीत सतेज पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत; मात्र राज्य पातळीवर राजकारणासाठी त्यांना जनतेतून निवडून आल्यास फायदेशीर ठरणार आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील आमदार आहेत. कोल्हापूर महापालिकेवर गेली दहा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परिणामी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून आ. सतेज पाटील हे ऐनवेळी रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये स्वत:, दक्षिणमध्ये पुतण्या ऋतुराज यांच्यासाठी आपण जिल्ह्यात अडकून राहायचे की राज्यात प्रचारासाठी फिरायचे? असा प्रश्न पाटील यांच्यासमोर आहे. त्याबरोबरच खा. शाहू महाराज यांच्या स्नुषा मधुरिमाराजे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान आ. जयश्री जाधव यांनी आपण कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविणारच, असे स्पष्ट केले आहे. परिणामी कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसकडून आ. जाधव, सतेज पाटील की सरप्राईज उमेदवार, हे लवकरच कळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT