निळपण येथे शेकडो एकर जळीत झालेला ऊस  pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur sugarcane fire short circuit - निळपणमध्ये शॉर्टसर्किटने ऊसशेतीला भीषण आग!

Kolhapur sugarcane fire short circuit - सव्वाशे एकरांतील ऊस जळून खाक; शेकडो शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कोनवडे:भुदरगड तालुक्यातील निळपण येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सुमारे सव्वाशे एकरांतील ऊसशेती जळून खाक झाली. या आगीत शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले., संपूर्ण परिसरातील ऊसशेतीला मोठा फटका बसला आहे. ऐन दिवाळीच्या सणातच शेतकऱ्यांच्या वर्षभराचे कष्ट वाया गेल्याने निळपण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मंगळवारी (दि. १०) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास म्हसोबाचा माळ परिसरात शॉर्टसर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रात असलेली आग वाऱ्याच्या वेगामुळे काही वेळातच भडकली. दुपारी अडीचच्या सुमारास आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी आणि धुराच्या प्रचंड लोटांनी संपूर्ण परिसर व्यापला. पाहता पाहता आग निळपण गावाच्या हद्दीतून थेट दारवाड गावच्या शिवेपर्यंत पोहोचली. त्यामुळे मोठ्या क्षेत्रातील हिरवीगार ऊसशेती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

आगीची भीषणता लक्षात घेऊन बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचा वेग आणि वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आग विझविण्यात मोठ्या अडचणी आल्या. त्यातच आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुरेसा पाणंद रस्ता नसल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी जाणेही कठीण झाले. अखेर अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली; परंतु तोपर्यंत सुमारे सव्वाशे एकरांतील ऊस जळून खाक झाला होता.

विशेष म्हणजे, निळपण गावातील ऊसशेतीला गेल्या दोन वर्षांत सलग अशाच आगीच्या घटनांना सामोरे जावे लागले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी वीज वितरण यंत्रणेची नियमित तपासणी, धोकादायक विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच तलाठी वर्षाराणी गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. मात्र, केवळ पाहणी करून प्रश्न सुटणार नाही. शासनाने तातडीने सर्व बाधित शेतकऱ्यांच्या जळीत क्षेत्राचे पंचनामे करावेत, नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

वर्षभर ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता पिकविलेला ऊस डोळ्यांदेखत जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. ऊस हेच अनेक कुटुंबांचे प्रमुख आर्थिक साधन असताना या आगीने त्यांच्या आर्थिक नियोजनालाच मोठा धक्का दिला आहे. दिवाळीच्या सणात प्रत्येक घरात आनंदाचे दिवे उजळत असताना निळपणमधील अनेक शेतकरी कुटुंबांच्या वाट्याला मात्र चिंतेचा अंधार आला आहे.

आता प्रशासनाने केवळ पंचनाम्यांपुरते मर्यादित न राहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि लवकरच नुकसान द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.kandueh

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT