चंदगड : तुडीये (ता. चंदगड) येथे आठ दिवसापूर्वी लग्न झालेल्या नामदेव जोतिबा चांदीलकर (34) या तरुणाने राहत्या घरी माडीवरील तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. 24 रोजी रात्री बारा ते पहाटे सहा यादरम्यान घडली. याबाबतची फिर्याद महेश चांदीलकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
बैलूर (बेळगाव) येथील मामांच्या मुलीसोबत नामदेवचा तीन वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता. सासरची महालक्ष्मी यात्रा सहा मे पासून सुरू होणार आहे. या यात्रेआधी म्हणून आठ दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. नामदेवने कोल्हापूर येथे जोतिबा दर्शनाला जाण्यासाठी भाड्याने गाडी ठरवली होती. शनिवारी सकाळी त्याच्या पत्नीने दारात रांगोळी घातली होती. सर्वजण देवदर्शनासाठी जायच्या तयारीत होते.
मात्र उशीर झाला तरी नामदेव उठला नाही, म्हणून माडीवर जाऊन कुटुंबीयांनी बघितले असता नामदेवने तुळईला गळफास लावून घेतला होता. माडीवर एका खोलीत त्याचा भाऊ तर दुसऱ्या खोलीत नामदेव झोपला होता. खालच्या मजल्यात त्याचे वडील, आई, पत्नी झोपले होते. सर्वजण देवदर्शनाला जायच्या तयारीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबीय दुखात बुडाले.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. तो गावाजवळील म्हाळुंगे येथे साखर कारखान्याच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी, भाऊ, सासू-सासरे आहेत. चंदगडचे पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. टी. आंबुलकर तपास करत आहेत.