सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील भारती एकनाथ सुतार (वय ४७) यांचा गावातील विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती सुतार यांचा गावातील विहिरीत पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मयत भारती यांचा मुलगा प्रमोद एकनाथ सुतार यांनी याबाबत माहिती दिली. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. राधानगरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
भारती सुतार यांच्या निधनामुळे सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात कुटुंबियांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थित उपस्थितांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.