पाणी वापराबाबत लष्करी शिस्तीची आवश्यकता! 
कोल्हापूर

Kolhapur News : पाणी वापराबाबत लष्करी शिस्तीची आवश्यकता!

इथे आहेत दाढीसाठी बादलीभर पाणी घालवणारे महाभाग शॉवरबाथ बाथटब ही चैन भविष्यात न परवडणारी

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : वाढती लोकसंख्या, कृषी सिंचन क्षेत्रात होत असलेली वाढ आणि वाढते औद्योगिकीकरण यामुळे भविष्यात पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. त्यामुळे पाणी वापराबाबत लष्करी शिस्त लागू करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा केवळ पाण्यासाठी म्हणून देशांतर्गत यादवी माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही उधळपट्टी काय सांगते!

साधारणत: १०-१५ लिटरच्या बादलीत कुणाचीही आंघोळ व्हायलाच पाहिजे. पण शहरी भागातील काही मंडळींना चार-पाच बादल्या डोक्यावर ओतून घेतल्याशिवाय चालतच नाही. काहीजणांना तर म्हणे शॉवरखाली अर्धा - पाऊण तास भिजल्याशिवाय आंंघोळ केल्यासारखेच वाटत नाही. तारांकित व पंचतारांकित हॉटेलंमधील आंंघोळीची तऱ्हा तर औरच आहे. शे-पाचशे लिटरच्या बाथटबात किंवा लाखो लिटर पाण्याच्या स्विमिंग तलावात डुबक्या मारल्याशिवाय या मंडळींची म्हणे आंघोळच होत नाही.

बेसुमार गैरवापर!

बहुतांश हॉटेल्स, खानावळी, मोठमोठी भोजनालये, रस्त्यांवरील खाद्यपदार्थांचे गाडे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाण्याची बरबादी चालते. ‘तहान घोटभर, पण पुरवठा पोटभर’ असा इथला कारभार आहे. इथे प्रत्येक ग्राहकामागे किमान अर्धा ते पाव लिटर तरी पाणी गटारात फेकून दिले जाते.

लष्करी जवानांचा आदर्श!

लष्करी जवान देशाच्या कोणत्याही भागात तैनात असले तरी त्यांना दिवसाकाठी मोजून मापूनच पाणी पुरवठा केला जातो. प्रतिदिन २५ ते ५० लिटरच्या घरात हे पाणी असते. एवढ्या पाण्यात ते जवान आपली दैनंदिन नित्यकर्मे आणि तहानही भागवतात. सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी खडा पहारा देणारे हे लष्करी जवान केवळ २५-५० लिटर पाण्यात आपला गुजारा करीत असतील तर पंख्याखाली किंवा एसीमध्ये बसणाऱ्या नोकरशहांना आणि मध्यमवर्गीयांना दररोज शेकडो लिटर पाणी कशाला पाहिजे. शहरी भागातील पाण्याच्या बरबादीला भविष्यात कठोर उपाययोजना करून आळा घालण्याची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT