कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा नियोजनबद्ध, प्रभावीपणे राबवा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केली. अंबाबाई मंदिरातील कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या १४४५.९७ कोटी रुपयांच्या निधीला ६ मे २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. नियोजन विभागाने २८ ऑगस्ट २०२५ रोजी आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. त्यातून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूळ मंदिराचे जतन, संवर्धन, दुरुस्तीचे ३२.९६ कोटी रुपयांचे काम सुरू आहे. २३.०५ कोटी रुपयांची विद्युतीकरण, सीसीटीव्हीची कामे सुरू आहेत.
मंदिराचे पुरातन वैभव, भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण २८,०५८ चौरस मीटर जमिनीचे मूल्यांकन केले असून त्यापैकी १९,४८९ चौरस मीटर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनाची प्रक्रिया नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.
तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर व देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकाने, ॲम्पिथिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टिपर्पज हॉल, पोलीस ठाणे, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शहा यांनी मंदिर परिसरात विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत प्रदर्शित केलेल्या फ्लेक्सची पाहणी केली. यापूर्वीची स्थिती आणि काम पूर्ण झाल्यानंतर बदले जाणारे स्वरूप याचीही त्यांनी माहिती घेतली.