मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू 
कोल्हापूर

Kolhapur News : मांजराला वाचवण्याच्या प्रयत्नात विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

कंदलगाव येथील हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

उजळाईवाडी : कुत्र्याच्या तावडीतून आपल्या पाळीव मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विजेचा तीव्र धक्का बसून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. ३०) दुपारी तीनच्या सुमारास कंदलगाव (ता. करवीर) येथील पाटील मळा परिसरात घडली. शाहू संदीप पाटील (वय १३) असे मुलाचे नाव आहे.

शाहू हा सातवीत शिकत होता. दुपारी शाळा सुटल्यानंतर तो घरी आला. घरात जेवण करत असतानाच विहिरीचे पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर सुरू करण्यात आली होती. याच दरम्यान घरातील पाळीव मांजराच्या मागे एक कुत्रा लागल्याचे शाहूच्या निदर्शनास आले. आपल्या लाडक्या मांजराला वाचवण्यासाठी तो तातडीने धावला. मात्र, या घाईगडबडीत त्याचा पाय किंवा हात मोटरच्या विद्युत वायरला लागला आणि त्याला विजेचा तीव्र झटका बसला. शाहू जागीच कोसळल्याचे पाहून कुटुंबीयांनी तत्काळ त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी शेंडा पार्क येथील केंद्रात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली असून, रात्री उशिरा गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

परिसरात हळहळ

एका मुक्या जीवाला वाचविण्याच्या प्रयत्नात स्वतःचे प्राण गमावणाऱ्या शाहूच्या अकाली निधनाने कंदलगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, बहीण, चुलते असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT