कोल्हापूर ः स्टेशनरोडवरील गोकुळ हॉटेलसमोर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. चालकाचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार एका बेकरीमध्ये घुसली. सुदैवाने दुर्घटना टळली असली, तरी बेकरी चालक विश्वनाथ सखाराम टेंबुळकर (वय 60) पत्नी साक्षी (55) किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी मोटार चालक सिस ईपान सिरीयाक (60, रा. पिंगळे गुरव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोटार चालक सिस सिरीयाक शाहूपुरी येथील घोरपडे गल्लीतून रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. वळणाचा अंदाज न आल्याने त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला व मोटारीची दुचाकीला धडक बसली. दुचाकीला चुकविण्याच्या प्रयत्नात मोटार पूर्ण विरुद्ध दिशेला फिरून दत्तगुरू बेकरीमध्ये घुसली. जोरदार धडक बसल्यामुळे बेकरीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मोटार बेकरीच्या दारातील लोखंडी स्टँडला जाऊन थांबल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमध्ये 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे बेकरीमालक विश्वनाथ टेंबुळकर यांनी सांगितले. मोटारचालक सिस सिरीयाक याला मोटारीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघातामुळे स्टेशनरोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.