कोल्हापूर : तब्बल चार तास मनोरंजनानंतर अवघ्या पंधरा मिनिटांच्या थरारात शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकाने दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडून एक लाख रुपयांचे बक्षीस पटकाविले. सुमारे ३५ फुटांवरील दहीहंडी सात थर रचत फोडून उपस्थितांची मने जिंकली.
न्यू गुजरी मित्र मंडळाच्या दहीहंडीचे यंदा ४० वे वर्षे होते. प्रतिवर्षीप्रमाणे गुजरी कॉर्नर महाद्वार रोड येथे या भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी सोहळ्यास आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे महेश जाधव, हेमंत आराध्ये, राष्ट्रवादीचे अदिल फरास, महेश जाधव, शंकर पाटील, मंगेश चिवटे, नगरसेविका मंगल साळोखे यांच्यासह आजी-माजी नगरसेविक आणि विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संयोजन न्यू गुजरी मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण नकाते, नगरसेविका माधुरी नकाते, अमर नकाते, सत्यजित सांगावकर, नितीश पटेल, हुसेन सय्यद, विनीत कटके, नियाज नंदीकर, संतोष खोबरे आदींनी केले.
राधा-कृष्ण मूर्ती अन् सेलिब्रेटींची उपस्थिती
सोहळ्यात दहीहंडीच्या वर कलाकार अजित भोसले यांनी साकारलेली झोपाळ्यावर विराजमान राधा-कृष्णाची प्रतिमा लक्षवेधी ठरली. बिग बॉस मराठी फेम रशियन अभिनेत्री इरिना हिने हिंदी-मराठी गीतांच्या तालावर नृत्याचे सादरीकरण केले. बालकलाकार अदिती जाधव यांच्यासह रिद्धीमा शुक्ला, लाक्षी चौधरी, इशिता, श्रेया धाकटे, प्रियांका रासकर, कुमार संजू आदी कलाकार व सेलिब्रिटींनी आपल्या आदांनी कोल्हापूरकरांना तब्बल चार तास खिळवून ठेवले. तत्पूर्वी 'करवीर गर्जना' ढोल-ताशा पथकानेे दमदार सादरीकरण केले, तसेच शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके सादर केली.