सरवडे : सावर्डे पाटणकर (ता.राधानगरी) येथील सरपंच सुमन विलास मोरे यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर बुधवारी (दि.२८) विशेष गावसभेचे आयोजन केले होते. यामध्ये झालेल्या मतदानामध्ये अविश्वास ठराव संमतीच्या बाजूने बहुमत झाल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम यांनी दिली .
सरपंच सुमन मोरे ह्या सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या कारभार करतात अशा अन्य कारणाने त्यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. १६जानेवारी रोजी ग्रामपंचायत सभेत सदस्यांनी ९ विरुद्ध १ अशा मतांनी मंजूर झाला होता. त्यानतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर मंजूर अविश्वास ठरावासाठी विशेष गावसभा घेऊन या ठरावास सहमती असहमती यासाठी मतदान घेण्यात आले. त्यानुसार बुधवारी (दि.२८ जानेवारी) सावर्डे पाटणकर येथील प्राथमिक शाळेत सकाळी ८ ते ११ या वेळेत मतदान घेण्यात आले.
प्रारंभी ११५० लोकांनी संमती मतदानासाठी नोंदणी केली . त्यापैकी एकूण ११३८ लोकांनी चार वाजेपर्यंत मतदान केले. लगेचच मतमोजणी घेण्यात आली त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या संमतीच्या बाजूने ५८२ तर असमतीच्या बाजूने ५३८ मते तर १७ मते अवैध झाली. त्यामुळे अविश्वास ठराव ४७ मतांनी मंजूर करण्यात आला अशी माहिती गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम यांनी दिली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी यासाठी निवडणूक अधिकारी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ७० कर्मचारी कार्यरत होते. अविश्वास ठराव मंजूर झाल्याने गुलालाची उधळण करण्यात आली.