कोल्हापूर

शिक्षकांचे सातव्या वेतनचे प्रलंबित हप्ते, पेन्शन त्वरित अदा करा : आमदार सतेज पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते तसेच सेवानिवृत्तीची रक्कम थकीत असून त्यामुळे त्यांना आर्थिक समस्या उद्भवत आहे. त्यामुळे ही रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे मंगळवारी केली.

पुरवणी मागणीद्वारे यासाठी आवश्यक रकमेची मागणी केली असून निधी उपलब्धतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची थकबाकी भागवली जाईल, असे लेखी उत्तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

आ. पाटील यांनी इतर शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांना दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता मिळाला असताना शिक्षक व शिक्षकेतर सातवा वेतनाचा फक्त पहिला व काही ठिकाणी दुसरा हप्ता मिळाला आहे. थकबाकीच्या तिसरा व चौथा हप्ता देण्यासंदर्भात 9 मे व 24 मे 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला असतानाही दोन्ही हप्ते देणे प्रलंबित आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत शिक्षक संघटनांकडूनही थकबाकी तातडीने जमा करण्याची मागणी होत असून थकीत रकमा अदा करून कर्मचार्‍याना दिलासा द्यावा, अशी मागणी केली.

SCROLL FOR NEXT