कोल्हापूर : गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी परिसरात सोमवारी सायंकाळी धावत्या केएमटी बसचे पुढचे चाक अचानक निखळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. बोंद्रेनगरहून कागलकडे जाणाऱ्या या बसमध्ये सुमारे ३५ प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र निखळलेले चाक रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका मोपेडवर आदळल्याने तिचे नुकसान झाले. या घटनेमुळे पापाची तिकटी ते माळकर तिकटी मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गंगावेस येथे बस थांबल्यानंतर चालकाच्या लक्षात पुढील चाकामध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे आले. चाकातून उष्णतेमुळे वास येत असल्याने चालकाने तातडीने केएमटीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.
नियंत्रण कक्षाकडून बस सावधगिरीने शिवाजी चौकापर्यंत आणण्याच्या आणि तेथे पर्यायी बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार चालकाने अतिशय कमी वेगाने बस पुढे नेण्यास सुरुवात केली. मात्र, बस पापाची तिकटी येथे पोहोचताच पुढचे चाक अचानक निखळून रस्त्यावर पडले. त्यानंतर ते बाजूला एका दुकानासमोर उभ्या असलेल्या मोपेडवर जाऊन आदळले.
काही काळ वाहतूक विस्कळीत
अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठा आवाज झाला आणि बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या अपघातामुळे पापाची तिकटी ते माळकर तिकटी या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.