कोल्हापूर : भारतीय सैन्य दलातील निवृत्त मेजर जनरल (व्ही.एस.एम) एम.एन. तथा मधुकर नारायन काशीद (वय ७४) यांचे निधन झाले. पुणे येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी अनिता काशीद, मुलगा कर्नल अमित काशीद, सुन-नातू, भाऊ मेजर जनरल अनिल काशीद (सेवानिवृत्त), कॅप्टन अशोक काशीद असा मोठा परिवार आहे.
मेजर जनरल मधुकर काशीद हे एनडीएच्या माध्यमातून १९७४ साली तोफखाना विभागात सेकंड लेफ्टनंट झाले. विविध ठिकाणी युनिट कमांडनट म्हणून ३९ वर्षे त्यांनी देशसेवा बजावली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सैन्य भरती प्रक्रिया सहज व सोपी केली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना २००८ साली विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले.
ब्रिगेडीयर असताना त्यांनी चायना बॉर्डरवर युनिट कमांड, ब्रिगेड कमांड, स्ट्रॅटजीकल कमांड अशी महत्वपूर्ण जवाबदाऱ्या यशस्वी केल्या. सन २०११ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे वडील नारायण आप्पा काशीद हेही वायूसेनेत होते. यामुळे काशीद कुटूंबाला तीन पिढ्यांचा लष्करी वारसा लाभला आहे.
दिंडनेर्ली येथे आज अंत्यसंस्कार
दरम्यान, त्यांचे पार्थीव सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजता, आर.के.नगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी १ वाजता, दिंडनेर्ली (ता. करवीर) या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी आजी- माजी सैनिक, पंचक्रोशीसह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन वीर जवान आजी- माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.