Rankala Lake  File Photo
कोल्हापूर

Rankala Lake Pollution : रंकाळा प्रदूषणाबाबत महापालिकेला नोटीस

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः रंकाळ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत आहे. कपडे, जनावरे धुतल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. एकूणच रंकाळा तलावाचे प्रदूषण होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत खुलासा करावा, अन्यथा जलप्रदूषण नियंत्रण कायदा 1974 नुसार कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक अधिकारी निखील घरात यांनी नोटिसीत दिला आहे.

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी रंकाळा प्रदूषणाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. श्याम सोसायटी येथून काळेकुट्ट सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत असल्याचे दिसून आले होते. या नाल्यात प्लास्टिक कचरा तरंगताना आढळला होता. महापालिकेने येथे पाणी उपसा करण्यासाठी पंप बसविलेला नाही.

पहिल्या पावसातच मातीचा बंधारा वाहून साठलेला सर्व कचरा रंकाळ्यात मिसळण्याची शक्यता आहे. संध्यामठ, तांबट कमान, परताळा या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. कपडे व जनावरे धुतली जात होती. रंकाळ्याच्या काठावरील हातगाड्या आदींमुळेही प्रदूषण सुरू आहे. रंकाळ्यातील पाणी सोडण्याचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे रंकाळा तलावाचे प्रदूषण त्वरित रोखावे, मिसळणारे सांडपाणी रोखावे, कपडे, जनावरे धुणे बंद करून पर्यावरणाची हानी रोखावी, असे नोटिसीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT