जयसिंगपूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिरोळ तहसीलदार, इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी व आंदोलन अंकुश यांच्यात झालेल्या बैठकीत मोठा गदारोळ झाला. जोपर्यंत प्रोसेस बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका घेऊन कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला. अखेर इचलकरंजीतील प्रोसेसधारकांनी प्रदूषित पाणी सोडण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रोसेस बंदचा निर्णय घेतल्याची माहिती तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी दिली.
आंदोलन अंकुशकडून प्रोसेसचे पाणी नदीत मिसळणे बंद न झाल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा दिला होता. मंगळवारी सायंकाळी शिरोळ तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला खा. धैर्यशील माने, आ. राजेंद्र यड्रावकर ऑनलाईन पद्धतीने, तर तहसीलदार अनिलकुमार हेळकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निखिल घरत, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील व आंदोलक उपस्थित होते.