जयसिंगपूर: सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील बायपासवर मंगळवारी दुपारी तीन वाजता पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची भीषण घटना घडली. हॉटेल सिग्नेचरजवळ पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर अचानक उलटल्याने सुमारे १० हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मिरज येथून हा टँकर कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ओव्हरटेक अनियंत्रित होऊन बायपासवर उलटला. टँकर उलटताच त्यातील पेट्रोल वेगाने रस्त्यावर वाहू लागले. पेट्रोल ज्वालाग्राही असल्याने मोठा अनर्थ टाळण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत सांगली-कोल्हापूर बायपासवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे रोखून धरली.
बायपासवरील वाहतूक बंद केल्यामुळे सर्व वाहने जयसिंगपूर शहरातून उदगावमार्गे वळवण्यात आली. याचा थेट परिणाम जयसिंगपूर-उदगाव मुख्य मार्गावर झाला. अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने दुपारी 3 पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल तीन ते चार तास या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भवणार नाही. सांडलेल्या पेट्रोलमुळे परिसरात उग्र वास पसरला होता.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात इंधनाची नासाडी झाल्याने ऑईल कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला काढण्याचे व रस्ता स्वच्छ करण्याचे काम सुरू होते.