इचलकरंजी : इचलकरंजीसाठी दूधगंगा नदीवरील सुळकूड उद्भवातून मंजूर करण्यात आलेल्या पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती अभिजित पटवा यांच्यासह कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र शासनाने १६५.७० कोटी रुपयांच्या या योजनेला मंजुरी देत ‘अमृत २.०’ योजनेत समावेश केला. मात्र, विरोधामुळे योजना रखडली. अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित आहे. जिल्हाधिकार्यांनी २१ फेब्रुवारी२०२४ रोजी दिलेल्या अहवालात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे. काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर साठवण क्षमताही वाढू शकते.
याचिकेत संबंधित योजनेची सद्यस्थिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली असून न्यायालयाने १५ जुलै २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी २१ जुलै २०२६ रोजी होणार आहे. यावेळी उमेश पाटील, महावीर कोल्हापुरे, राजू कोन्नुर, सुहास पाटील, उदयसिंह निंबाळकर उपस्थित होते.