कोल्हापूर : गेल्या २२ वर्षांपासून डॉक्टर डेनिमित्ताने दै. ‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेली ‘डॉक्टर्स डे व्याख्यानमाला’ यावर्षी २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आरोग्यविषयक प्रबोधनाचे प्रभावी व्यासपीठ ठरलेल्या या उपक्रमाचे यंदाचे वक्ते ख्यातनाम बालरोग व जीवशैलीतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी आहेत. या व्याख्यानात ते ‘दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
बुधवारी (दि. १) सायंकाळी ५.१५ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नूतनीकरण झालेल्या वातानुकूलित सभागृहात होणारा शाहू जयंती कार्यक्रमानंतरचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असल्याने कोल्हापूरकरांना या व्याख्यानाची उत्सुकता आहे.
आरोग्याचा समग्र दृष्टिकोन मांडणार
डॉ. हेमंत जोशी दीर्घ अनुभवी बालरोगतज्ज्ञ असून, आहार व जीवनशैली विशेषज्ञ म्हणून त्यांची जगभरात ख्याती आहे. जीवनशैली विषयात त्यांचा गाढा अभ्यास आणि अनुभव आहे. त्याआधारे ते परखड मते मांडतात आणि स्वतःही ती तत्त्वे आपल्या जीवनात पाळतात. त्यामुळे त्यांच्या शब्दाला एक वजन प्राप्त झाले असून त्यांच्या विचारांवरून प्रेरणा घेत जगभरातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे.
एकंदरीतच धकाधकीचे आणि धावपळीचे जीवन, वाढता ताणतणाव, व्यायामाचा अभाव, वाढती व्यसनाधिनता तसेच बदलेली जीवनशैली, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण यामुळे मनोविकार, रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, अपचन, निद्रानाश, कॅन्सर हृदयविकार यासारखे आजार वाढत आहेत. आजार झाल्यावर उपचारासाठी नवनवीन ज्ञान, तंत्रज्ञान विकसित होत आहे. असे असताना आजार होऊच नयेत म्हणून जीवनशैलीतील बदल कोणते बदल करावेत, तसेच आजार झाल्यानंतर कमीत कमी औषधोपचारासह आपले आरोग्य कसे बाधित ठेवावे, मुले सदृढ, सक्षम आणि पराक्रमी कशी बनतील, याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. आरोग्यासाठी जागरूक नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, पालक व शिक्षक यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
डिजिटल पुस्तके मोफत
डॉ. अर्चना व डॉ. हेमंत जोशी यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावर बालसंगोपन, लसीकरण, मधुमेह निवारण आणि ‘ईट राईट’ आदी विषयांवर ११ भाषांतून पुस्तके व व्हिडीओनिर्मिती केली आहे. हे सर्व साहित्य डिजिटल क्यूआर कोडद्वारे उपस्थित श्रोत्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर
डॉ. जोशी हे विरार (पालघर) येथे गेली ४० वर्षे निष्ठेने कार्यरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे जन्मलेल्या डॉ. जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक आणि भोसला मिलिटरी स्कूल (नाशिक) येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि बालरोगशास्त्रातील एमडी ही पदवी संपादन केली. ‘१५० न्यू आयडियाज टू इम्प्रूव्ह ग्लोबल चाईल्ड सर्व्हायव्हल’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या हँडबुक्सचे ते सहलेखक आहेत.
कार्यक्रमाचा तपशील
विषय : दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली
वक्ते : डॉ. हेमंत जोशी (ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ)
वार व दिनांक : बुधवार,
दि. १ जुलै २०२६
वेळ : सायंकाळी ५.१५ वाजता
स्थळ : शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
विशेष सूचना
कार्यक्रमाला प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून, पहिल्या तीन रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील पालक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.