रवींद्र देसाई
कडगाव : भुदरगड तालुक्यातील पाटगाव या निसर्गरम्य गावाला राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा सन्मान दिला असून, इयत्ता चौथीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकात ‘द हनी व्हिलेज’ या धड्याद्वारे पाटगावची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या धड्यामुळे पाटगावची ओळख आता महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचली असून गावाच्या मध उत्पादन चळवळीला नवी प्रसिद्धी मिळाली आहे.
पाठ्यपुस्तकातील धड्यात पाटगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव असून ते ‘हनी व्हिलेज’ अर्थात ‘मधाचे गाव’ म्हणून ओळखले जाते, असे नमूद करण्यात आले आहे. गावातील अनेक नागरिक मधमाशी पालन करून शुद्ध व नैसर्गिक मधाचे उत्पादन घेतात. तज्ज्ञ आणि निसर्गप्रेमी व्यक्तींनी विकसित केलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळाली आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थी हा धडा शिकत असल्याने पाटगावची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी ओळख निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा उत्कृष्ट संगम म्हणून पाटगावचे उदाहरण विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावाच्या मध उत्पादन उपक्रमाबाबत उत्सुकता वाढत असून अनेकजण पाटगावविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.