कोल्हापूर : पावसाने ओढ दिल्याने धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. परिणामी, धरणांतून होणाऱ्या विसर्गावरही परिणाम होऊ लागला आहे. यामुळे गेल्या सहा दिवसांत पंचगंगेची पाणी पातळी तब्बल सहा फुटांनी कमी झाली आहे. पाणी पातळीत झपाट्याने घट होऊ लागल्याने, शहराचा पाणी उपसा मंगळवारी बंद झाला. यामुळे शहरात टंचाईच्या झळा वाढण्याची शक्यता आहे. पंचगंगेत राधानगरी, दूधगंगेच्या गैबी कालव्यासह तुळशी, कुंभी व कासारी या प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असतो. पाऊसच नसल्याने या सर्वच धरणांतील पाणीसाठा खालावला आहे. तो झपाट्याने कमी होत असल्याने पंचगंगेची पाणी पातळीही त्याच वेगाने कमी होत चालली आहे.
धरणांतच नाही, तर नदीत कुठून येणार?
राधानगरी धरणात सध्या केवळ २.१४ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या दिवशी तो ४.५७ म्हणजे आजच्या पेक्षा दुपटीहून अधिक होता. दूधगंगा धरणात तर केवळ २.२३ टीएमसी म्हणजे केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी तो २३ टक्के होता. कासारीत २२ आणि कुंभीत ३२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच साठा अनुक्रमे ३४ आणि ४९ टक्के होता. यामुळे या सर्व धरणांत मिळून ६.७७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
पंचगंगेत सध्या १,१५० क्युसेक विसर्ग
पिण्याच्या पाण्यासाठी पंचगंगेत राधानगरी धरणातून ६०० क्युसेक, तुळशी धरणातून २५०, तर कुंभीतून ३०० क्युसेक असा एकूण १,१५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर शहराचा विचार करता हे पाणी कमीच आहे.
कोल्हापूरचा पाणी उपसा दिवसभर बंद
कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईनचा उपसा यापूर्वीच बंद आहे. सध्या शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा या ठिकाणांहून पाणी उपसा केला जात होता. कमी पातळीमुळे दिवसभर उपसा करता आला नाही. विसर्ग सकाळी वाढवल्यामुळे रात्रीपर्यंत पातळीत वाढ होऊन उपसा सुरू होण्याची शक्यता आहे.