कोल्हापूर

Kolhapur News: पंचगंगा घाट होणार मजबूत

Arun Patil

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक पंचगंगा घाट आता मजबूत होणार आहे. तब्बल 105 मीटर लांबीचा अखंड दगडाचा घाट तयार करण्यात येणार आहे. अडीच कोटींतून घाटाचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे. त्याबरोबरच संपूर्ण घाट आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळणार आहे. दगडी घाटाचा हेरिटेज लूक कायम ठेवून घाटाचा कायापालट केला जाणार आहे.

पंचगंगा घाट म्हणजे कोल्हापूरचे वैभव आहे. पंचगंगा घाटाला सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास आहे. पंचगंगेच्या काठावर प्राचीन मंदिरांचे वास्तुवैभव आहे. ही मंदिरे म्हणजे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. याच परिसरात राजघराण्यातील व्यक्तींची स्मृती मंदिरेही आहेत. त्यापैकी सर्वात मोठे व सुंदर देवालय श्री छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांचे आहे. हे मंदिर 1885 साली बांधण्यात आले आहे. घाटाचा परिसर निसर्गरम्य आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे शहरवासीय याठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यासाठी एकवटतात.

पंचगंगा घाट विकास व संवर्धनासाठी 2 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जुने निखळलेले दगड काढून त्या ठिकाणी त्याच पद्धतीचे दगड बसविण्यात येणार आहेत. त्याची लांबी 45 मीटर आहे. छत्रपती शिवाजी पुलाकडील बाजूस पिकनिक पॉईंटच्या खाली नव्याने घाट बांधण्यात येणार आहे. जुन्या घाटासारखेच पाच टप्पे असणार आहेत. त्याची लांबी 60 मीटर असेल. संपूर्ण घाटाच्या मागे दगडी कमान बांधली जाणार आहे. त्यामुळे घाटाचा लूक पूर्ण बदलणार आहे. कोल्हापूरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.

आकर्षक रोषणाईने उजळणार घाट

संपूर्ण पंचगंगा घाट आकर्षक विद्युत रोषणाईने उजळण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 3 कोटी 50 लाखांचा आराखडा आहे. पंचगंगेला दरवर्षी पूर येतो. त्यामुळे वॉटरप्रूफ साहित्याचा वापर केला जाणार आहे. पुराच्या पाण्याने विद्युत रोषणाई किंवा विद्युत पोल खराब होऊ नयेत, अशी टेक्नॉलॉजी वापरण्यात येणार आहे. 10 मीटर डेकोरेटिव्ह डबल आर्मचे हेरिटेज प्रकारातील खांब उभारण्यात येणार आहेत. घाट परिसरातील सर्वच मंदिरांवर स्पॉट लाईट सोडण्यात येणार आहेत. त्याबरोबरच पंचगंगा घाटावरून छत्रपती शिवाजी पुलावर स्पॉट लाईट टाकल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT