पंचगंगा घाटावर श्रमदान 
कोल्हापूर

Kolhapur News : शेकडो हात पुढे आले, कचऱ्याचे साम्राज्य दूर झाले

पंचगंगा घाटावर श्रमदान : कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अबालवृद्ध सहभागी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगा आरती सेवा मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सकाळी पंचगंगा घाट परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंचगंगा नदीची पातळी कमी झाल्यामुळे नदीपात्रातील अनेक प्राचीन मंदिरे उघडी पडली असून त्यांच्या परिसरात तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आणि अन्य कचरा साचला होता. हा कचरा हटविण्यासाठी शेकडो कोल्हापूरकर स्वयंस्फूर्तीने एकत्र आले.

सकाळी सात वाजता आबालवृद्धांनी घाटावर हजेरी लावत स्वतःसोबत आणलेल्या झाडू, फावडी, हातमोजे आणि अन्य साहित्याच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम हाती घेतली. नदीपात्रातील मंदिर परिसर आणि घाटावरील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. जमा झालेला कचरा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने तातडीने हटविण्यात आला. स्वच्छता मोहिमेमुळे प्राचीन मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून निघाले. शेकडो हाताने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याने नदीपात्र प्लास्टिकमुक्त होण्याबरोबरच परिसर स्वच्छ झाला.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जेसीबी, डंपर आणि इतर वाहनांच्या साह्याने कचरा उठावाचे काम करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचगंगा नदी व घाट परिसर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी महिन्यातील एक रविवार स्वच्छता अभियानासाठी देण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पंचगंगा स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र आहे.

विविध संस्था, संघटना, मंडळांचा सहभाग

या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, संघटना, युवक मंडळे आणि ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग स्वतःचा मोहीम यशस्वी केली. कोणतीही अपेक्षा न ठेवता नागरिकांनी केलेल्या श्रमदानातून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी दर्शन घडले. एकाच वेळी शेकडो लोक सहभागी झाल्याने पंचगंगा घाट परिसर गर्दीने फुलून गेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT