सरवडे : भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी परिसरात फिरायला गेलेल्या नरतवडे (ता. राधानगरी) येथील तरुणाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अजित दत्तात्रय चौगले (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले असून, या घटनेने नरतवडे गावावर शोककळा पसरली आहे.
नरतवडे येथील अजित चौगले हे आपल्या मित्र परिवारासह आरळगुंडी परिसरात सहलीसाठी गेले होते. सर्वजण एकत्र जेवण बनवण्याची तयारी करत असताना अचानक वातावरणात बदल झाला. जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली आणि त्याच वेळी कोसळलेल्या विजेचा तीव्र फटका अजित चौगले यांना बसला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
कुटुंबाचा आधारवड हरपला
अजित चौगले हे मनमिळावू आणि नेहमी मदतीला धावून जाणारे युवक म्हणून परिसरात परिचित होते. त्यांचा विवाह अवघ्या दीड वर्षांपूर्वी झाला होता. संसाराची स्वप्ने नुकतीच आकार घेत असतानाच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ आणि आजी असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ अचानक हरपल्याने चौगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गावात हळहळ
आनंदाच्या क्षणांसाठी मित्रांसोबत गेलेल्या तरुणावर काळाने अशी झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नरतवडे गावात शोकमय वातावरण असून, गावकऱ्यांकडून चौगले कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.