नागाव : येथील आंबेडकर नगर परिसरात विजेच्या उच्च दाबाच्या तारेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या वानराला वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या या वानराला उपचारासाठी हलवण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत असून, त्याचा जीव वाचवावा यासाठी नागरिक प्रार्थना करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ ग्राउंड परिसरातील झाडांवर गेल्या काही दिवसांपासून या वानराचा वावर होता. दोन दिवसांपूर्वी झाडाजवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला वानराचा स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने वानर थेट जमिनीवर कोसळले.
वानर जमिनीवर निपचित पडलेले असताना काही कुत्र्यांनी त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. अशाही गंभीर जखमी अवस्थेत वानराने स्वतःला सावरत कसाबसा झाडावर चढून आपला जीव वाचवला. गेल्या दोन दिवसांपासून हे वानर अन्न-पाण्याशिवाय एका घरावरून दुसऱ्या घरावर वेदनेने विव्हळत फिरत होते. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख प्रदीप सुतार हे आपल्या पथकासह आणि सर्व आधुनिक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत कौशल्याने आणि वानराला कोणतीही इजा न पोहोचवता त्याला सुरक्षितरीत्या पकडण्यात आले.
या वानराला विजेचा खूप मोठा धक्का बसला आहे. आम्ही त्याला वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे आवश्यक उपचार करत आहोत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.प्रदीप सुतार (प्रमुख, रेस्क्यू पथक, वनविभाग)