नागाव : महामार्गालगत नागाव फाटा येथील प्रितम स्टील मध्ये शुक्रवारी दुपारी मटेरियल उतरत असताना क्रेन पलटी होऊन बूम खाली चिरडून रशीद खान रा.उत्तरप्रदेश या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेशच्या आमदाराने कोल्हापूर येथील आमदारांशी संपर्क साधला असून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.. तर कुटुंबीयांनाही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
क्रेन पलटी झाल्याची घटना घडल्यानंतर कंपनीच्या प्रशासनाने पोलिसांना माहिती देणे क्रमप्राप्त व अपेक्षित होते.पण असे काही न करता कंपनीच्या कामगारांनी बाहेरील लोकांना आत येण्यास मज्जाव केला होता. तसेच कंपनीमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, हॅन्डग्लोज,बूट अशी सुरक्षित उपकरणांची कोणतीच उपाययोजना केलेली दिसून येत नाही. तर या घटनेची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना काळविल्यानंतर घटनास्थळी पोलीस आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.त्यामुळे घटनेच्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करावी जेणेकरून सत्य घटना समोर येईल.
घटनेची माहिती समजताच मयत परप्रांतीय कामगाराच्या गावचे सरपंच, स्थानिक आमदार यांनी कंपनी प्रशासन ,पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क साधून आमचे गावाकडील नातेवाईकांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करावे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शनिवारी रात्री उशीरापर्यंत नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी उत्तरप्रदेश येथील आमदारांनी कोल्हापूरातील स्थानिक आमदारांना फोन करून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
दरम्यान शनिवारी लोक जनशक्ती पार्टी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सपोनि सुनील गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र निरीक्षक विनोद वाघवेकर.जिल्हा महासचिव संजय गाडे. कोल्हापूर जिल्हा कामगार सेल अध्यक्ष स्वप्नील तराळ, सुनिल पोवार, जालिंदर कांबळे. अविनाश बाचने. शशिकांत कांबळे, धिरज सटाले, अरविंद कांबळे हर्शल खाबडे, स्वप्नील माने, सत्यजित मोहीते पाटील, उपस्थित होते.
त्यांनी ही घटना कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाली आहे. त्यामुळे या कंपनीवर कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल करावा. मयत रशीद च्या कुटूंबियास न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी लोकजनशक्ती पार्टी कामगार सेना कोल्हापूर जिल्हा यांच्यावतीने निवेदनाद्वारे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्याकडे केली आहे.