कोल्हापूर : जिल्ह्यात यावर्षी पाच लाख झाडे लावली जाणार आहेत. त्याचा प्रारंभ बुधवारपासून केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी हरित प्राधिकरणाची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यात २०४७ पर्यंत १ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले.
राज्यात यावर्षी ११ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी जिल्ह्यात ५ लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, खासगी -सार्वजनिक सहभाग (पीपीपी), ग्रामपंचायतींचे नियोजन आणि विविध विभागांचा समन्वय यावर भर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाची वृक्षारोपण मोहिमेची आढावा बैठक मंगळवारी दुपारी झाली. तत्पूर्वी जिल्हा पातळीवरील स्थापन केलेल्या हरित प्राधिकरणाची जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.