विवाहिता मृत्यूप्रकरण; डॉक्टरचीही होणार चौकशी 
कोल्हापूर

Kolhapur Crime : विवाहिता मृत्यूप्रकरण; डॉक्टरचीही होणार चौकशी

मुलगा होण्यासाठी उपचार घेतले काय, याची घेणार माहिती; चौघांना २२ पर्यंत पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुलगी झाल्याच्या कारणासह पाच लाखांच्या हुंड्यासाठी अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिचा शारीरिक व मानसिक छळ करून जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती प्रतीकसिंग काटकर, सासरे वीरेंद्रसिंग काटकर, सासू मनीषा काटकर व नणंद ऋतुजा काटकर यांना मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दि. २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्रसूती काळात अस्मिता उपचार घेत असलेल्या डॉक्टरांकडे चौकशी करण्यात येणार आहे. मुलगा होण्यासाठी विशेष उपचार घेतले काय, याचीही माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. पाच लाखांच्या हुंड्यासह मुलगी झाल्याच्या कारणातून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अस्मिता प्रतीक काटकर हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबतची फिर्याद विवाहितेची आई संगीता सरदेसाई यांनी दिली होती.

डोहाळे जेवण, प्रसूती, बारसे यासह विविध कारणांसाठी काटकर कुटुंबीयांनी हुंडा स्वरूपात पैसे उकळल्याचा आरोप सरदेसाई कुटुंबीयांनी केला आहे. काही रक्कम ऑनलाईन पद्धतीने पाठवली होती. यामुळे काटकर आणि सरदेसाई कुटुंबातील व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी बँक खात्यांची चौकशी होणार आहे.

अंत्यसंस्कारावेळी तणाव

अस्मिताच्या अंत्यसंस्कारावेळी तणावाचे वातावरण असल्याने राजारामपुरीतील सामाजिक कार्यकर्ते काका पाटील, कमलाकर जगदाळे, अनुप पाटील, मदन जाधव, संजय जाधव यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. सर्वांनी पुढाकार घेऊन सासरच्या मंडळींची समजूत घालून पंचगंगा स्मशानभूमीत अस्मिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT