Kolhapur Monkey Attack 
कोल्हापूर

Kolhapur Monkey Attack : शेपूट कापलं कुणीतरी... गावाला पडलं वानर भारी!

सोळांकूरमध्ये ‌‘मंकी लॉकडाऊन‌‘; वन विभागासह ग्रामस्थांचा जीव टांगणीला

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश कारंडे

बिद्री : कोरोना कालावधीतील लॉकडाऊन विसरला असाल, तर जरा सोळांकूर (ता. राधानगरी) गावाला भेट द्या! गेल्या पाच दिवसांपासून येथे कोणत्याही विषाणूने नाही, तर एका चवताळलेल्या वानराने गावाला हाऊस अरेस्ट केले आहे. कोणाची तरी बुद्धी चालली आणि त्याने या वानराची शेपूट थोडी कापली. बस्स! मग काय? माझी शेपूट कापलीच कशी, या इर्षेने पेटलेल्या या वानराने थेट 63 जणांचा चावा घेतला आहे. यामध्ये 5 ते 7 जण गंभीर जखमी आहेत, तर 7 ते 8 जणांना दुचाकीवरून खाली पाडून वानराने आपल्या स्टंटबाजीचे प्रदर्शन घडवले आहे.

मुळात हे वानर जंगलातून रेस्क्यू करून आणून सोडलेल; पण वन विभागाच्या मते, दोनपेक्षा जास्त वेळा रेस्क्यू झाल्यामुळे या वानराला सोळांकूरच्या गल्ली-बोळांची इतकी खडान्‌‍ खडा माहिती आहे की, गुगल मॅपसुद्धा फिका पडेल! कुठे दबा धरून बसायचे आणि कधी सरप्राईज अटॅक करायचा, यात ते पारंगत झाले आहे. राधानगरी आणि भुदरगडची 15 जणांची रेस्क्यू टीम आणि गावातील 150 तरुण काठ्या घेऊन मागे पळत आहेत; पण वानर कोणालाच दाद देईना. 25 तारखेला या शातीर वानराला बेशुद्धीचे तीन डार्ट (इंजेक्शन) मारले; पण पठ्ठ्याने ते हाताने काढून फेकून दिले आणि ‌‘पुष्पा स्टाईल‌’ने हुलकावणी दिली.

आता परिस्थिती अशी आहे की, दुधाची किटली आणायची असो की किराणा, हातात काठी घेतल्याशिवाय कोणी बाहेर पडत नाही. गावात सध्या माकडताप नसला, तरी माकडाचा प्रचंड संताप पसरला आहे.

वानराच्या महाभारताचे दोन मुख्य पैलू

माणूस माझा शत्रू! :वन विभागाने खात्री केली आहे की, वानर पिसाळलेले नाही; पण त्याचा रोख फक्त आणि फक्त माणसांवरच आहे. इतर प्राणी किंवा पक्षांना सोडून हे वानर केवळ माणसांनाच लक्ष्य करत सुटले आहे. त्यामुळे माणूस हाच वन्यजीवांचा शत्रू या वाक्याचा वानराने उलटा सूड घेतला आहे.

आता बास झालं, विषय संपवा! : वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर मंदिरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची शाब्दिक धुलाई केली. ‌‘अहो, याला ठार का मारत नाही?‌‘ असा थेट सवाल ग्रामस्थांनी टाकला; पण कायद्याचे बोट दाखवत अधिकाऱ्यांनी सांगितले, ‌‘गाव वन विभागाच्या हद्दीत असल्याने ठार मारता येणार नाही.‌‘ अखेर ‌‘काहीही करा; पण हा मंकी बिझनेस संपवा,‌‘ असा अल्टिमेटम ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT