कोल्हापूर : आयुष्यभर धुणे, भांडी, मोलमजुरी करून साठविलेल्या 5 लाख 25 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना सदर बाजार येथील निंबाळकर माळ येथे घडली. याप्रकरणी आवाक्का भीमसेन सरीकर (वय 55) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने बनावट किल्ल्यांचा वापर करून चोरी केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्याचा छडा लावण्यात येईल, असे सांगण्यात आले. आवाक्का सरीकर निंबाळकर माळ परिसरात राहतात. कुटुंबीयासमवेत वृद्ध कर्नाटकातील रायबाग येथील यात्रेसाठी गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने बनावट किल्लीचा वापर करून घरात प्रवेश केला.
घरातील पोटमाळ्यावर ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप उघडून त्यामधील पाचशे, दोनशे व शंभर रुपयांच्या एकूण 5 लाख 25 हजारांच्या रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. आवाक्कासह कुटुंबीय सकाळी घराकडे परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीला आला. आयुष्यभर कष्ट करून साठविलेल्या पुंजीवर चोरट्याने डल्ला मारल्याने कुटुंबाला धक्का बसला. कुटुंबाने शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे धाव घेऊन चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.